स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी : आ. दिलीप वळसेपाटील

Foto
मुंबई  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा होईल. त्यानंतर पुढील 21 दिवसांत या निवडणुका पार पडतील. त्याचदरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत. तर, अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 31 जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.

निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकीच्या तारखांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. 

आहदिलीप वळसे पाटील म्हणाले, 2017 साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 2022 मध्ये पुढच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं. परंतु, राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सुटलेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात गेलं. तिथेही हा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे या निवडणुका तीन वर्षे पुढे ढकलल्या गेल्या. दरम्यानच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी जी तयारी केली होती ती वाया गेली.

31 जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका पार पडणार

आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की वाट्टेल त्या परिस्थितीत 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत.

कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

आता दोन-तीन दिवसांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असतील तर आपल्याला तयारी करावी लागेल. येथील स्थानिक निवडणुकीत 17 प्रभाग आहेत. त्यामुळे आपल्याकडून 17 लोकांना संधी मिळणार आहे. नगराध्यक्षांची निवड होणार आहे. सर्वांनाच संधी मिळणार नाही. ज्याला संधी मिळेल तो आपल्या पक्षाचा उमेदवार असेल. प्रत्येक उमेदवार हा घड्याळाचा (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उमेदवार आहे हे लक्षात ठेवून तुम्ही कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे.

दिलीप वळसे पाटलांनी जाहीर केल्या तारखा?

दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे नगरपंचायतीच्या निवडणुका चालू असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. साधारणपणे 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होईल. त्याआधी नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असतानाच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. 15 जानेवारीला त्यासाठीच मतदान होईल. 31 जानेवारी पूर्वी सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन हा निवडणूक कार्यक्रम संपलेला असेल आणि नवीन लोकांच्या हातात सत्ता मिळालेली तुम्हाला दिसेल.